Thursday, April 24, 2014

’नमो’चे स्लोक !


प्रस्तावना : जय गुजरात. केम छो? माजे भाई आनी बैनो. एवाना आमाला तुमी पयचानले असेल. आमी गुजराती लोक जिकडे जाईल तिकडचे होऊन जातो. ताठर बाण्याने काय बी भले होत नाही. तुम्च्यापेक्सा आजून कोन जादा समजनार म्हणा. आमी धंदा करतो आनि तुमी निस्ता वांदा करा. युतीचा जयजयकार छो.
जास्तीचा टायम न दवडता, मुद्द्याला येतो. तुम्च्या महाराष्ट्रात आलो आहे. त्यामुळे तुटकं फुटकं मराटी बोल्णार हाय. चुक भुल लेन देन. तुम्चे राम्दास स्वामी, मोटा संत मानूस. त्यान्चे मनाचे श्लोक वाचले आनी दिमाग मंदि एक्दम सरस आयडीआ आली. इलेक्स्न टायमाला याच्यामंदे ’मोदी’फ़िकेसन करून तुम्च्या समोर प्रस्तुत करावे. एक्दम चोक्कस जमलयं. हिमेसभाई, जिग्नेसभाई मंडलीला नाय समजले तरी वांदा नाय, तसाबी माज्या बोल्ण्याला काय सुरत नस्ते. तर मंडली ढोकला, फाफडा खात खात वाचा आनी आवडले तर जरूर सांगा.

नमोचे स्लोक !

नमोधीश जो ईश सर्वा गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ||
नमो चारदा मूळ मॅनीफेस्टो वाचा |
गमू पंथ आनंत या महामानवाचा ||||

मंगलाचरण :नमोजो सर्व ईश्वरी गुणांचा(!) ईश्वर आहे, देवाधीपती आहे, निर्गुण ब्रह्माची म्हणजे सत्व, रज आणि तम हे गुण नसण्याची सुरुवात जेथुन होते अशा या महामनवाला नमो नमुन अनंतात विलीन होण्यास भाजपच्या पंथी आपण मार्गक्रमण करू. मात्र त्या आधी चार वेळा भाजपचा मॅनीफेस्टोचे पठण करा. त्यामुळे पुढे आपण ज्या खडतर मार्गाचा अवलंब करणार आहोत त्याची क्लॅरीटी राहील.

नमो दुर्जना शक्तिपंथेंचि जावें |
तरी श्रीहरी पाविजेतों स्वभावें ||
जनीं वंद्यतें सर्व सोडून द्यावें |
जनीं निंद्य तें स्नूप गेट करावें ||||

अर्थात : आळी मिळी गुप चिळी, बळी तो कान पिळी. दुर्जनाला नमस्कार करून भक्तीपंथाला विसरून शक्तीपंथाच्या मागे लागावे. आपले बाहू सतत स्फुरत रहायला हवेत, सलमानसारखे. शक्तीचे एकमेव प्रतीक आमची ५६” निधडी छाती (फक्त पुरूषांसाठी) दडवून ठेवण्यासाठी आहे काय? हि-मॅन फेम ललकारी – “आय हॅव दि पॉवर” चहू दिशेला गुंजू दे.  आपले हेच बलशाली आचरण श्रीहरीला प्रसन्न करेल तो पावेल. जगात जे काही म्हणून वंदनीय आहे त्या सर्व गोष्टींचा तत्काळ त्याग करावा. आपल्याला प्राप्त सर्व शक्तींचा आणि सरकारी फौजफाट्याचा पुरेपूर उपयोग करून एखाद्याच मुलीच्या मागे लागावे.

सोईने मनीं राम चिंतीत जावा |
पुढें वैखरी रहिम नंतर वदावा ||
सदैव रक्त हे सांडूंन ये तू |
जनीं तोचि मोदी मानवी धन्य होतो ||||

नमो कुवाच : कधी पाठीवर, कधी पोटात, कधी डोक्यावर तर कधी ओठात असा आपल्या सोईने रामाचेभजनकरावेपुढे स्थळ-काळाचे भान ठेऊन रहिमचे पठण किंवा जप(वैखरी) करावे. मुंह में राम, बगल में छुरी म्ह्णून त्या छुरीने सदैव रक्तरंजीत क्रांती करावी. असे केल्यानेच मोदी नावाचा अमानवी मानव धन्य धन्य होतो, लौकीकास प्राप्त होतो.

जुने खोड त्याज्ये परी श्रीरामलूस तिकीट द्यावे
नाराजी सुषमास स्वराजी करावे
विनाशपुरूष ना कोणी मला वदावे
या उमा भारतीस कोणी समजवावे ॥४॥

अर्थाचा अनर्थ : इथे खोड जुनी या अर्थी घेता, जुने ओल्ड इज गोल्ड फेम घ्यावे. जुनी खोडे वाकतील असे सकृतदर्शनी(वरवर) वाटले तरी ते तुटत नाहीत. त्यामुळे जे तुटत नाहीत त्यांचा त्याग करावा, जे ऐकत नाही त्यांची उचलबांगडी करावी. ज्याच्या नावातच श्रीराम आहे(म्हणजे फक्त नावातच, कर्मात नाही) त्याला आपण राज्य करण्यास तिकीट देऊन रामराज्य आणण्यास हातभार लावावा. जय श्रीराम. अशा काही किरकोळ कारणांमुळे कोणी सुषमा ट्विटरवर नाराज झालीच तर गेली टोकावर असे करता समजूत काढावी. इथे आम्ही विकासाचे फाटके ढोल जोरजोरात बडवत असताना, उमा भारती सारख्या स्वकिय मंडळीनी जिव्हेवर(जिभ) ताबा ठेवावा (खाण्यासाठी नव्हे!). विनाशपुरूषासारखे शेलके उद्गार जपून वापरावे, हे उमाला कोण उमजावेल बरे?.

मला सांग पां येडूरप्पास काय जालें |
अकस्मात तें सर्वै दु:खी बुडालें ||
भ्रष्ट गूंडांशी राजकारणी असे समीप |
बळें लागले मुढ जन नितीच्या पाठि ||५।|

भावार्थ : मला सांग बंड्या (पां) मित्रा, येडुरप्पाने असा काय गुन्हा केला आहे ज्याने हे सकळ जन दु:खाच्या गर्तेत (दरीत) बुडाले आहेत. असे रक्तपिपासू, भ्रष्ट गुंड समीप (मंत्रीमंडळात) असणे हे भुषणावह असून सर्वसामान्य मुढ (मुर्ख) जन बळेच निती अनितीच्या मागे लागले आहेत.

मना सर्वथा सत्य सांगू नको रे |
गुजरात गाथा मिळुन मिथ्य मांडूं सारे ||
मना सत्य ते असत्य वाचे वदावें |
मना मिथ्य ते मिथ्य सोडू द्यावें ||||

नमो म्हणे : सत्याची दुनीया राहिली नाही हेच खरे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सत्य सांगू नये. संत तुकाराम गाथेनंतर संत नमो गुजरात गाथा हा ग्रंथ पारायणासी घ्यावा. आणि त्यातील मिथ्या ओव्यांमध्ये स्वत:ला वाहून घ्यावे. 

खोटया जहिरातींचा भडीमार चोहोबाजूंनी करावा
पैसा कोठून येतो यक्षप्रश्न हा पडावा
कॊटी बालकांच्या पोटी दाणाही नसावा
आश्वासनांची खैरात आणि हाती आणा चेपवावा ॥७॥

पुढारी बोल : बोलणर्याची म्हणे माती पण खपते मग आपले अती का नाही खपणार? सारा आसमंत नमो नमोच्या उच्चाराने दुमदुमुन सोडा. होऊ द्या खर्च म्हणा. जमा खर्च विचारणार्यांना इलेक्शन कमिशनकडे बोट दाखवा. गरीब जनतेला निवारा नाही नुस्ता फुंकररूपी वारा घाला, कुपोषीतांना पोषणाच्या कि शोषणाची खैरात वाटा, दाण्याच्याआऐवजी आणा वाटा. विजय निश्चीत आहे.

जगी धन्य वाराणसी पुण्यराशी |
तयेमाजि आता आपमुळे झाली काशी ||
मुखे मोदी नामावळी नित्यकाळी |
जिवा हीत सांगे सदा भाजप टोळी ||||

यथार्त : जगामध्ये जर काही श्रेष्ठ असेल तर ते वाराणसी शहर आहे. पुण्याच्या राशी तुमच्या राशी येतील. म्हणुनच मी माझा एवढा सुपीक गुजरात सोडून इकडे माझी वज्रमुठ घेऊन आलो आहे. पण नेमकी आपरूपी भुनभुनणारी माशी शिंकली. माझी जुनी प्रगतीपुस्तके काढून माझी खर्या अर्थानेकाशीकेली आहे. पण मी बघून घेईल. आपण आपल्या मुखामध्ये सततअबकी बार मोदी सरकारहे बालीश बोल बोलत रहा. सर्व सजीवांना भाजप टोळीने त्यांचे हित कशात आहे जे सांगत राहीले पाहिजे.

नको रे मला हा अरविंद हा भेदकारी |
नको रे मला पक्षातील विरोधी पुढारी ||
नको रे मला अड्वाणी माझे गुरू |
नको रे मला मत्सरू दंभ भारू ||||

नकार : अशा रितीने मी सर्व शक्तीनिशी दिल्ली काबीज करण्यासाठी, सज्ज झालेलो असताना माझ्या अवतीभवती फक्त अती खुशामती करणारे हुजरे हवे आहेत. मला माझ्या मार्गात अरविंदरुपी बोचरे काटे नको आहेत. पक्षांतर्गत बंडाळी नको आहे. सतत रुसणारे गुरू अडवाणी नकोसे आहेत. हे करताना माझे पाय जमिनीवर राहू दे. मला मत्सर, दंभ(अहं / इगो(ईं)) आदींचा लवलेशही नको. देवा वाचव मला.

मना प्रार्थना तूजला एक आहे |
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ||
विजयी आता हो यदर्थी कीजे |
मना सज्जना दिल्ली वस्ति कीजे ||१०||

प्रार्थना : साक्षात रघुनंदनही हा झगमगाट थक्क होऊन पहात आहे. त्यामुळे महाराजा आता मनोमन एकच प्रार्थना आहे, साकडे आहे. या घनघोर लढाईमध्ये मला आताविजयी भवअसा आशिर्वाद दे. मी येन केन प्रकारेण, साम, दाम, दंड, भेद वापरून पूर्ण प्रयत्न करेल.  मला दिवस रात्र दिल्ली स्वप्नात येते. झोप येईनासी झाली आहे. स्वर्ग दोन बोटे उरणे ते हेच बहुधा.
No comments:

Post a Comment